सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर चुकून फ्रीज च्या दरवाज्यात अडकला,,,,अडकलेला पदर कुठेतरी मला खेचत होता .
माझे बाबा, 4/5 किलो वजनाचे किंवा त्याही पेक्षा मोठ्ठ कलिंगड घेऊन येत असत. आमच्या लहानपणी गोलमटोल कलिंगड मिळायचे. अगदी खात्या पित्या घरची म्हणा. आता कशी लांबुडकी जणु काही दिपका पदुकोण किंवा प्रियांका नसतील तर ही रॅंप वॉक करतील, इतकी नाजूक कलिंगड. जेमतेम 2 किलो चि, स्वतः चि अगदी फिगर मेंटेन केलेली. तर सांगत काय होते??? ,,,
4/5 किलो चे कलिंगड बाबा गणपती आणावा तसे उचलून आणत असत.
घरात, सुऱ्या ही ठरलेल्या सफरचंद साठी नाजूक,, कलिंगड साठी दणकट आणि फणसा साठी खानदानी किंवा कोयता (तलवार कधी वापरली नाही एवढेच काय ते)
कलिंगड कापताना पोरांचाvt घोळका जमायचा. एका हाताने बोजाड कलिंगड पकडून त्याच्या पोटावर बाबा सुरी च्या टोकाने त्रिकोण इतका परफेक्ट आखत होते तितका परफेक्ट त्रिकोण माझा भूमितीचा वहित देखिल येत नव्हता. हssssळू, हssssळू हळू तो त्रिकोण कापून झाला की, खटॅक खच्च sssssssसुरीच्या टोकावर कलिंगड चा लाल तुरेदार त्रिकोण डौलाने उभा असायचा.
*कोंबडा ssssss *🍉
” मला, मला, मला,,,,,
” काल तिला दिला होता”.
” आज माझी पाळी.”
” का??? आज तुला का??? परवा दिला की…..
“पण त्या दिवशी कोंबडा थोडा तुटलेला होता” …
“चल,,, आलीस शहाणी… पण तू खाली ना…..”
त्या कलिंगड च्या कोंबड्या मागे आम्ही सर्व पिल्ल चॅव चॅव करत असू.
बाबा तो सुरा खोवलेला कोंबडा सर्वासमोर फिरवून कुणाला एकाला द्यायचे,,,, बाकीची भ्यॅsss😂 किंवा,,,, मला का नाही??? ,,, सर्वाना *अप्रृप * त्या 100 ग्रॅम कोंबड्या चे…. ठरल्याप्रमाणे आता आई आणि काकी चि एंट्री नक्की.
” उद्या तुला,,, ह्म्म,,,,
सांत्वन झाले, विषय संपला. पण जिच्या हातात कोंबडा ती काय टेंभा मारायची विचारू नका.
*अप्रृप *फक्त कलिंगडाच्या कोंबड्याचे नव्हते,,,,, रामफळ चा मधला देठ किंवा दांडा,, जो सर्वात जास्त तुरट असतो ( ही अक्कल तेव्हा नव्हती) तो ज्याला मिळेल , तो ,,काय मिरवायचा .,उगाचंच एक दोन तास चघळत बसायचा.
पपई चे शेवटचे चाक,जे पांढर्या पातळ डिंकाने भरलेले असायचे, तरीही त्या चाकाच्या मागे चक्रम सारखे तुटून पडत होतो. . कारण चाक फक्त कडेच निघते, ते एकच असायचे म्हणुन तर त्याचे “अप्रृप”
आंब्याची बाट एक, फोडी 4 ज्याला बाट मिळाली तो पांढरी होईपर्यंत चोखत बसायचा. आणि मग वाटायचे ” क्या बात (बाट) है” .. नारळ फोडला की त्याचे पाणी, कधीतरी नारळाच्या आतला कोंब, ( भला बेचव असला तरी) संत्र सोलले की जर एखाद्या फोडीला पिल्लू असेल तर तो भाग आपल्याला मिळावा म्हणुन देवाची quick प्रार्थना . मला साडे पाच फोडी, तिला संत्र्याच्या 5 फोडी, किती आनंद असायचा. ते मिळावे म्हणुन केलेली धडपड. कधी कधी थोडीफार चलाखी.
त्या अनमोल क्षणाचा आनंद तुम्हाला किती आणि कसा सांगावा? .
गोष्ट फळा पुरती नव्हती…
पाणी पिण्यासाठी छोटा चंबू किंवा लोटा , जेवताना खप्याचे चे ताट. इतकेच काय तर घरात असलेला एकमेव काटा चमचा प्रत्येकाला डोसा खाण्यासाठी हवा असायचा… वाटायच की ह्या सुरीने तिचा खून करावा ज्या बहिणीने पळत जाऊन भांड्यातून पहिलांदा शोधून आणला किंवा काटा डोळ्यात भोसकावा असे वाटायचे. एखाद्या जाहिराती वर मिळालेला “कप”, त्यातून दूध पिताना उगाच जास्त
गोड वाटायचे. कारण कप एक आणि बाजूला वाकडी तोंड चार
खरी मजा त्यात होती.
शिऱ्या मधले बेदाणे काजू हव तर समजू शकतो पण झुंज लागायची ती खरवडी साठी.
.भाकरीत देखील शेवटची छोटी भाकरी म्हणजे पोपली *आपल्या पानात , टणकरुन पडावी ही इच्छा. ,, मग किती मजा दुसर्या कडे मिश्किल पणे पाहून त्या *पोपली ला पानात थोपटत असू. फक्त पापी घेत नसू इतकेच काय ते.
गाडीतून फिरायला गेलो तर फ्रंट सीट वर बसायची धडपड.. कारण माझे काहीतरी वेगळे स्थान हा आनंद. (बाकी सगळे मागच्या सीटवर,,, हे त्या आनंद वाटायचे कारण)
मुंबई हुन आईची मावशी विमानाने आली. अर्थात मी डायरेक्ट नात त्यामुळे मिठाई चे पाकीट माझ्या हातात. मिठाई सर्वांना मिळाली पण आता तो नक्षीदार डब्बा माझ्या ताब्यात आला ह्यामुळे सर्वांच्या पोटात जास्त दुखले आणि तिथे खरी मिठाई जास्त गोड वाटली.
इतकेच काय विमानातल्या कापसाचा बोळा कित्येक दिवस मी गोंजारत होते . कारण तो फक्त माझ्या कडे होता.
ह्म्म्म्म मोठेपणा दाखवून सुवासिक नॅपकीन चे बरोबर 8 भाग करून सर्वांना दिले अगदी दानशूर कर्णा च्या अविर्भावात,,, शेवटी नाव वृषाली ना! 😆😆😆(कर्णाच्या बायकोचे नाव काय होते????? आठवा आठवा 😆😆) .
शाळेत डेकोरेशन नंतर राहिलेले
रंगीत खडू गोळा करायला आम्ही इतक्या जोरात पळत होतो की . पि.टी. उषा ला मागे टाकले असते. शाळेत, जिच्या कडे ऍल्युमिनियम चि स्कूल बॅग होती तिचे नखरे विचारू नका. कॅम्लिन चा कंम्पास जिच्याकडे असायचा तिची पट्ट मैत्रीण होण्याची चढाओढ असायची , कारण गुलाबी वासाच्या रबर ती आम्हाला हात लावायला द्यायची. वासाचा रबर फक्त नखऱ्याचा, पण एकुलता एक असल्यामुळे ती मैत्रीण सतत डिमांड मध्ये असायची. बिचारा स्वतः ला झिजवनाऱ्या नटराज रबर ला शून्य भाव कारण तो सगळ्या कडे होता. मग कसले आले अप्रृप
थोड्या फार मैत्रिणीं कडे फोल्डेड छत्र्या होत्या आणि त्या वर्गामध्ये दिमाखात अगदी मध्यभागी वाळत उभ्या असायच्या.
“ये, मला तुझी छत्री बंद करायला दे की”.
“नको आई ने सांगितले दांडा तुटेल कुणाला हात लावायला देऊ नकोस”.
आगाऊ पणा करत ती छत्री बंद बंद करत असे. आणि डोळे विस्फारून आम्ही फक्त बघत असू.
आमच्या लहानपणी एका टूथपेस्ट मध्ये बिनाका मिळत असत. त्या मुलींचा ग्रुप वेगळाच. दररोज त्यांचे कासव, मासा, कबुतर गोगलगाय ह्यांची देवाणघेवाण सुरू असायची. तिथे आम्हाला फिरकायला देखील परवानगी नव्हती . . जिच्या कडे BSA रंगीत सायकल होती तिच्या कॅरीयर ला सर्वांच्या बॅग्स अडकवल्या जायचा आणि मग वरात निघायची, आता विचार केला तर वाटते “येडी” चक्क हमाली करायची. पण ज्या स्टाइल मध्ये ती आमच्या बरोबर सायकल हातात घेऊन चालत असायची, व्वा!!!! तुम्ही पहिला असता तर आलिया भट्ट झक मारली इतकी स्टाइल मारायची. उंच टाचेची चप्पल घातलेल्या मुलींकडे बघत बसण्यापलीकडे आम्ही काही करू शकलो नाही.
अप्रृप अश्या साठी की त्या वस्तू मुळे कुठेतरी भाव मिळतो हा आनंद .
More demand, less supply,,, हे तत्व इथे लागु पडते का माहित नाही कारण मी फारशी अभ्यासू वृत्तीची नाही.
घरात ढीग भर चादरी असून एका गोधडी साठी रात्रीची मारामारी
डोक्यात कुठेतरी घर करून राहिली त्या मुळे मुलाला नमागता बर्याच गोष्टी देऊन मी स्वतः चि हौस जणू काही फिटवत राहिले.
मुलासाठी आणलेली खप्याची प्लेट अडगळीत धूळ खात पडली
. कौतुकाने मुलासाठी आणलेली ऍल्युमिनियम ची स्कूल बॅग, वायर, राहिलेले मोळे, दिवाळी च्या माळा,, कित्येक वर्ष बंद पडलेली बॅटरी,वगैरे वगैरे ने भरली.
मला “बिनाका” मिळाला नाही म्हणुन मुलाला मागेल तेव्हा कधी कधी मागायच्या अगोदर मॅक डोनाल्ड चे Happy Meal दिले . दोन दिवस तो toy ने खेळला मग पडला कचऱ्यात कुठेतरी. त्याला शोकेस मध्ये मानाचे स्थान शेवटी मीच दिले.
गाडीची फ्रंट सीट नाही पूर्ण गाडी माझी एकटीची आणि मी मुलाला घेऊन दररोज फिरवत होते. तरीही काहीतरी रहातच होते.
काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहिले.
खरोखरच तो कलिंगडाच्या कोंबडा हवा होता का??? ,,, का, तो एकच असतो म्हणुन हवा होता ,,, का, बाकीच्यांना नमिळता मला मिळाला हा आनंद होता? नेमके काय?? आज कित्येक वर्ष डायनिंग टेबल वर चमचा, सुरी आणि काट्या चा सेट स्टँड ला लोंबकळत पडला आहे. आता हातानेच डोसा खाते.
मिठाई च्या रिकाम्या डब्यात नेमका काय गोडवे पणा लपला होता? जो आम्हाला खुश करत असायचा???
जे आम्हाला मिळाले नाही ते मुलाला मागायच्या अगोदर दिले.
आजच्या मुलांच्या शब्द कोशात “अप्रूप” शब्द आहे तरी??????
कदाचित असेल पण आपल्याला ज्या गोष्टी भांडून मिळविण्यात, मग टेंभा मारण्यात मजा होती,, ती मजा sorry 😉 कन्सेप्ट ह्या पिढीने नक्किच अनुभवला नाही
खरच आहे,, सारे काही आपसूकच मिळाले तर कसले असणार “अप्रृप”
वृषाली उपेंद्र तेंडोलकर
अॅडव्होकेट
(बेळगाव)
©® सर्व हक्क लेखिकेच्या आधीन.
©®माझी कथा शेअर करायची असल्यास त्यात कुठलाही बदल नकरता माझ्या नावासह आणि फोटो सह शेअर करावी.
वृषाली तेंडोलकर
(बेळगाव)