Raghunathrav

बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांना दोन मुले. थोरला बाजीराव व धाकटा चिमाजी. बाळाजी यांच्यानंतर बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे प्रदान करण्यात आली. चिमाजीआप्पा बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून लढले. चिमाजीआप्पांना दोन मुले. सदाशिवराव भाऊ आणि रघुनाथराव. तर बाजीवर पेशवे यांना तीन मुले होती. बाळाजी ऊर्फ नानासाहेब हे थोरले. म्हणून थोरल्या बाजीरावांच्या नंतर नानासाहेब यांना पेशवाईचे वस्त्रे प्रदान करण्यात आली. नानासाहेब पेशव्यांना विश्‍वासराव, माधवराव, नारायणराव अशी तीन मुले होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सदाशिवराव आणि विश्‍वासराव मारले गेले. आता उरले चिमाजी आप्पांचे पुत्र रघुनाथराव आणि नानासाहेब पेशव्यांचे पुत्र माधवराव आणि नारायणराव. कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले आणि आता पोरसवदा माधवराव यांच्याकडे पेशवाईची वस्त्रे न जाता ती आपल्याकडे येतील अशी स्वप्ने रघुनाथरावांना पडू लागली. पण तसे व्हायचे नव्हते. वयाच्या सोळाव्या वर्षी माधवरावांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली गेली आणि रघुनाथराव आतल्या आत धुमसत राहिले.

रघुनाथरावांच्या मनसुब्याला काही कारभारी मंडळी खतपाणी घालीत होती. रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई यांनाही आपल्या अत्यंत पराक्रमी पतीला पेशवेपद मिळत नाही याचं वैषम्य वाटत होतंच. सोळाव्या वर्षी पेशवाईची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या माधवरावांनी ती अत्यंत नेटाने पार पाडली. आपल्या काकांच्या रघुनाथरावांच्या कटकारस्थानांना शह देण्यासाठी माधवरावांनी त्यांना शनिवारवाड्यातील बदामी महालात कैदेत ठेवले. परंतु माधवराव पेशव्यांचाही वयाच्या 27 व्या वर्षी विनासंतान मृत्यू झाला. यानंतरही पेशवे पद त्यांच्या भावाला नारायणरावांना दिले गेले. अटकेत असलेल्या रघुनाथरावांची कारस्थाने सुरूच होती. त्यांनी नारायणरावांना कैदेत टाकण्याचा बेत आखला. त्यासाठी गारद्यांना नारायणरावांना “धरावे’ असे पत्र दिले. ते पत्र रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई यांच्या हाती पडले. त्यांचे डोळे अघोरी आनंदाने चकाकले. त्यांनी गारद्यांच्या नकळत “ध’ चा “मा’ केला. गारद्यांनी नारायणरावांना “मारावे’ असे वाचले.संरक्षण व्यवस्थेत कसूर राहिली होती. त्याचा फायदा घेत गारद्यांनी पाठलाग करून नारायणरावांना कंठस्नान घातले. कटकारस्थाने करून रघुनाथराव पेशवे झाले खरे. पण पापाचं फळ फार अल्पजीवी असतं. नारायणराव पेशवे मारले गेले. पण त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी गंगाबाई यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव माधवराव दुसरे. अवघ्या काही महिन्यांच्या या बाळाच्या नावाने पेशवाईची सूत्रे हलू लागली आणि रघुनाथरावांना वर्षभरात पेशवाईच्या गादीवरून पायउतार व्हावं लागलं.

“ह’ चा “क’ केल्याची कथा

पेशवाईत “ध’ चा “मा’ झाला तसाच रामायणात मौखिक रूपात “ह’ चा ‘क’ करण्यात आला होता. झाले असे. रावणाला पराभूत करायचे असेल तर देवी चंडीची आराधना करणे आवश्‍यक आहे, असे ब्रह्मदेवाने श्रीरामांना सुचविले. त्यासाठी अश्‍विन महिन्याच्या प्रतिपदेला उपासनेचा आरंभ करण्याचे योजले. सलग नऊ दिवस शक्ती देवता चंडीची उपासना करायची. तिला प्रसन्न करून घ्यायचे. दहाव्या दिवशी लंकेच्या दिशेने प्रयाण करायचे. रावणाचा वध करून सीतेला सन्मानाने अयोध्येत आणायचे. असा बेत श्रीरामांनी आखला.

हेच ते नऊ दिवस आज आपण नवरात्र म्हणून साजरे करतो. तर दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करतो.
पूजेसाठी 108 निळ्या कमळांची व्यवस्था करण्यात आली. होम हवन, मंत्रपठण सुरू झाले. परंतु रावणाच्या मायावी शक्तीने 1 कमळ चोरले. ऐनवेळी ते निळे कमळ मिळणे अशक्‍य होते. पूजेत विघ्न येणार होते. देवी चंडिकेचा कोप पत्करावा लागणार होता. काय करावे हे कुणाला सुचत नव्हते. त्याचवेळी प्रजा आपल्याला “कमलनयन नवकंच लोचन’ संबोधते. म्हणजेच आपले डोळे नुकत्याच उमलणाऱ्या कमळाप्रमाणे आहेत असा विचार श्रीरामांच्या मनात आला. त्यांनी आपल्या एका डोळ्याची यज्ञात आहुती देण्याचे ठरविले. भात्यातला तीर हाती घेतला. डोळ्याजवळ नेला. तेव्हा प्रत्यक्ष देवी चंडिका तिथे प्रकट झाली आणि श्रीरामांच्या भक्तीवर प्रसन्न होत त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला.

तिकडे श्रीराम शक्तीची उपासना करण्याचे नियोजन करीत असताना इकडे रावणाने देखील अमरत्व प्राप्तीसाठी आणि विजय निश्‍चितीसाठी देवी चंडीची आराधना करण्याचे ठरविले होते. रावणाच्या पूजेला एक बालक उपस्थित होते. ते यज्ञासाठी उपस्थित ब्राह्मणांची अत्यंत इमाने इतबारे सेवा करत होते. ब्राह्मणांच्या हाताखाली लागणारी सामग्री वेळच्या वेळी पुरवीत होते. त्या अत्यंत तेजस्वी बालकाची निःस्वार्थ सेवा पाहून उपस्थित ब्राह्मणवृंद अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले. म्हणाले, “तू आमची अत्यंत मनोभावे सेवा केली आहेस. ती पाहून आम्ही मनस्वी प्रभावित झालो आहोत. तुला हवा तो वर मागून घे.’ त्यावर ते बालक नम्रपणे म्हणाले, “देवा, आपण माझ्या सेवेवर प्रसन्न झालात हा माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण आहे. मला काही नको. पण एक विनंती आहे आपण ज्या मंत्राच्या साह्याने चंडिकेची पूजा करणार आहात त्या मंत्रात “ह’ ऐवजी “क’असे उच्चारण करावे. “जयदेवी जयदेवी जय भूर्तिहरिणी’ ऐवजी “जयदेवी जयदेवी जय भूर्तिकरिणी’ असे म्हणावे. यातली ग्यानबाची मेख त्या ब्राह्मणांच्या लक्षात आली नाही. त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मंत्रपठण केले. भूर्तिहरिणी म्हणजे विघ्न हरण करणारी आणि भूर्तिकरिणी म्हणजे विघ्न निर्माण करणारी. साहजिकच यज्ञसमाप्ती होताच देवी तिथे प्रकट झाली. क्रोधित होऊन रावणाच्या विजयमार्गात अनेक विघ्ने निर्माण करण्याचा आशीर्वाद देऊन निघून गेली. ब्राह्मणांनी त्या बालकाकडे पाहिले. तेव्हा त्याने आपले मूळ रूप धारण केले आणि उपस्थित सर्वांना हनुमानाचे दर्शन झाले. साहजिकच अयोध्यानरेश श्रीराम आणि लंकाधीपती रावण यांच्यात घनघोर युद्ध होऊन रावणाचा पराभव झाला. त्याला श्रीरामांच्या हातून मरण आले.

जसं रघुनाथरावांच्या बाबतीत घडलं तसंच रावणाच्या बाबतीत. रघुनाथरावांनी कट करून नारायणरावांचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला. रावणाने मायावी शक्तीचा वापर करून श्रीरामांच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण दोघांच्या पदरी शेवटी अपयशच आले. अलीकडची राजकीय परिस्थिती पूर्वसुरींने जे पेरले तेच आता दहा अंगांनी उगवून आले आहे असे दिसते. त्यामुळेच माणसाने खोट्याची कास धरू नये हेच खरे.

विजय शेंडगे

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

भावपूर्ण श्रद्धांजली

काही लोकांचे कर्तृत्व इतके मोठे असते कि एक आक्खा काळ त्यांच्या नावावर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…

गर्विष्ठ राजकन्या

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार…

आज भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका, लावण्यवती मा.अंजनीबाई मालपेकर यांची पुण्यतिथी.

संजीव वेलणकर मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर…