सर्वच चित्रपट करमणूक म्हणून पाहायचे नसतात. काही चित्रपट निव्वळ प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करण्याची दिग्दर्शकाची क्षमता अनुभवण्यासाठी पाहायचे असतात. जोकर हा चित्रपट त्यातीलच एक.
सुपरहिरो चित्रपटांत मारवेल वाल्यानी भरपूर धिंगाणा घातला असला तरी माझ्या मनाला भावते ते DC कॉमिक्स सच. DC ची बॅटमॅन ट्रिलॉजि माझ्या मते सर्वात उत्कृष्ट सुपरहिरो चित्रपट होते. नोलान ह्यांच्या सिद्धीप्राप्त प्रतिभेने लॉन्ग हॅलोविन ह्या सुप्रसिद्ध कॉमिक्स ला घेऊन हे ३ चित्रपट बनवले. लॉन्ग हॅलोविन हे कॉमिक खरोखर उत्कृष्ट होते. हार्वी डेन्ट, बॅटमॅन आणि जिम गॉर्डन हि त्रयी मित्र बनतात आणि गॉथम मधील गुन्ह्याच्या दुनियेवर युद्ध पुकारतात. त्यातून त्यांचा ब्रोमान्स सुरु होतो. तिन्ही व्यक्ती आपापल्या पद्धतीने “obsessed” असतात. (मराठींत ह्याला साक्षेप म्हणतात काय ?)
त्यांच्या ह्या obsession मुळे त्यांच्या तिघांच्या खाजगी प्रेमजीवनाला सुरुंग लागतो. तिघांच्याही प्रेमिका वेगळ्या. जिम ची पत्नी मुलांवर केंद्रित असते. बॅटमॅन ची प्रेमिका सेलिना खाईल हि अत्यंत स्वतंत्र मानसिकतेची असते तर डेन्ट ची पत्नी त्याच्यासोबत मूल निर्माण करण्याची अभिलाषा ठेवून असते. ह्या दरम्यान हॅलोविन ला एक खून होतो आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यांत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी एक एक खून होत जातो.
तिन्ही हिरो आपापल्या पद्धतीने ह्या गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यांत फाल्कन फॅमिली, कॅलेंडर मॅन, कॅटवूमन, जोकर आणि जवळ जवळ इतर सर्व मोठे बॅटमॅन व्हिलन हजेरी लावतात. अत्यंत गूढ असे हे खून आणखीन गूढ होत जातात आणि बॅटमॅन ला हे आपली चूक असे वाटत जाते. शेवटी ह्याची परिणीती जोकर माफिया ला हाताशी धरून डेन्ट च्या तोंडावर ऍसिड फेकतो आणि डेन्ट चा टू फेस बनतो. बॅटमॅनच्या दृष्टिकोनातून केस सॉल्व होते पण त्याचे सर्वत्र हिरावून नेले जाते. सेलिना त्याला सोडून जाते. डेन्ट हा मित्र शत्रू बनतो, जिम गॉर्डन ची पत्नी सोडून जाते. पण ह्या कथेचा अँटी क्लायमॅक्स आहे. केस प्रत्यक्षांत सॉल्व होत नाही. खुनाच्या मागे नक्की कोण असतो हे फक्त वाचकांना समजते.
लॉन्ग हॅलोविन वरकरणी सुपरहिरो आणि गुन्हा प्रकारचे मनोरंजन वाटले तरी प्रत्यक्षांत अत्यंत प्रौढ स्वरूपाचे कॉमिक आहे. लहानपणी आपली नाती सोपी असतात. मैत्री लवकर होते आणि जिवाभावाची वाटते. पहिल्या प्रेमात आपण असे गुंततो कि इतर सर्व काही शुल्लक वाटते. पण प्रौढ पणी सर्व नात्याना वेगळ्या झालरी लागतात. मैत्री किंवा प्रेम टिकवून ठेवावे लागते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि अनेक त्याग करावे लागतात. त्याशिवाय आपला स्वभाव आणि आपली मानसिकता हि सुद्धा आडवी येते. आयुषांत सर्व काही मिळणार नाही हि भावना वाढू लागते. है सर्व गोष्टी लॉन्ग हॅलोविन मध्ये लोएब ह्यांनी अत्यंत समर्थ पणे दाखविल्या.
नोलान ह्यांनी हे कथानक घेऊन त्यांत बरेच बदल केले आणि त्याला मोठ्या पडद्यावर अत्यंत समर्थ पणे उभे केले.
आधुनिक सुपरहिरो चित्रपट माझ्या मते चित्रपट सृष्टीला लागलेला एक कॅन्सर आहे. एवेन्जर्स इत्यादी चित्रपट माझ्या मते अत्यंत सुमार दर्जाचे होते. पण चित्रपट सुमार असले म्हणून समस्या नाही. अगदी antman सारखे भिकार सुपरहिरो चित्रपट बिलिअन डॉलर क्लब मध्ये बसू लागले तेंव्हा मात्र हे पाणी डोक्यावरून जायला लागले आहे हे समजू लागले. मोठ्या मोठ्या स्टुडिओनी अचानक प्रचंड पैसे सुपरहिरो चित्रपटांकडे वळवले.
एके काळी हिट चित्रपट बनविण्यासाठी मेहनत घ्यावी लागायची. त्यासाठी टेलेन्ट शोधले जायचे. चांगले कथानक निर्माण केले जायचे. तो प्रकार जवळ जवळ गायब होत आहे. बहुतेक सुपरहिरो चित्रपट गुलाबी रंगाचे स्फोट, काळ्या रंगाचे विचित्र एलियन्स, तोकड्या कपड्यांत किंवा टाईट्स मध्ये फाईट करणाऱ्या स्त्रिया आणि ह्या सर्वाना डायव्हर्सिटीच्या नावाने कृष्णवर्णीय लोक, गे इत्यादी लोकांचा तडका. मग शेवटी प्रचंड मोठी फाईट आणि सुपरहिरो जिंकून घरी जातात.
ह्याला अपवाद आहेतच. कॅप्टन अमेरिका एक अत्यंत चांगला चित्रपट होता. त्यातील ग्रेनेड सिन माझ्या मते सर्व सुपरहिरो चित्रपटांतील सर्वांत चांगला सिन असावा.
Watchmen हा असाच एक अत्यंत चांगला सुपरहिरो चित्रपट आणि त्याच्यावर आधारित HBO ची सिरीज सुद्धा थक्क करणारी होती. पण त्याला न्याय देण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागेल. Watchmen स्कॉट स्नायडर चा चित्रपट होता ह्याच्या सकरपंच च्या चित्रपटाचे समीक्षण मी ह्याआधी इथे लिहिले होते.
मारवेल (डिस्नी) च्या यशाने वॉर्नर कंपनीला मिरच्या झोबल्या आणि त्यांनी त्यांच्या पायावर पाऊल टाकून स्नायडर ला घेऊन त्यांनी अत्यंत घटिया चित्रपटांची निर्मिती केली. सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वूमन ह्यांच्या सारख्या सुपरहिरोना घेऊन अत्यंत रद्दी चित्रपट बनवले. आणि त्यांच्या अपयशाचे खापर स्नायडर वर फोडले.
पण जोकर हा चित्रपट ह्याला अपवाद. जोकर हा जगांतील सर्वांत सुप्रसिद्ध व्हिलन. ह्याला काहीही सुपरपावर नाहीत. तरी सुद्धा इतर कुठल्याही व्हिलन पेक्षा हा माणूस उरांत धडकी भरवितो. ह्याने रॉबिन ला रॉड ने बडवून बडवून मारले. जिम गॉर्डन च्या डोळ्यापुढे त्याच्या मुलीला नग्न करून तिचे कंबर मोडले आणि तिला आजन्म व्हाईलचेर साठी ठेवले. त्याशिवाय जोकर ने लक्षावधी लोकांना ठार मारले असेल. लहान मुलांच्या खेळण्यांत बॉम्ब ठेवून त्यांना मारले. ख्रिसमस च्या दिवशी लहान मुलांच्या पुढे त्यांच्या आईवडिलांना ठार मारले. जी डॉक्टर त्याच्यावर काम करत होती तिला आधी आपल्या प्रेमात ओढून नंतर तिला वेडे केले आणि आपल्याप्रमाणे विल्लन केले आणि त्याशिवाय तिला अब्युस केले ते वेगळे.
जोकर सर्वार्थाने मानवजातीतील सर्वांत खराब व्यक्ती आहे. पण तो नक्की असा का ? ह्या प्रश्नाचे उत्तर क्वचितच कॉमिकस मध्ये सापडते. जोकर चे ओरिजिन तसे स्पष्ट नाही. काही ठिकाणी तो एक खूप जुना अगम्य असा व्यक्ती आहे (रेस अल गुल प्रमाणे) तर काही ठिकाणी भुरटा चोर जो बॅटमॅन च्या चुकीने एका रसायनात पडला आणि त्याचा जोकर झाला.
पण जोकर हा चित्रपट त्याचे ओरिजीन फार चांगल्या आणि वास्तव पद्धतीने दाखवतो. जोकर हा लुजर आहे. वास्तविक जीवनात अनेक लूजर्स आपल्याला दिसतात. त्यातीलच हा एक. चित्रपट पाहताना आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटतेच पण त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून गिल्टी सुद्धा वाटते. चित्रपट जोकर च्या दृष्टिकोनातून दाखवला गेलाय आणि त्याचे डिप्रेसशन काही ठिकाणी प्रेक्षक म्हणून आम्हाला सुद्धा जाणवते.
मग चित्रपटाच्या शेवटी मानवी शरीरात अडकलेला तो लुजर निरुपद्रवी माणूस अचानक बदलतो, त्याचा जोकर बनतो. आणि अचानक त्याच्याबद्दल आम्हाला भीतीयुक्त आदर वाटू लागतो. तो किळसवाणा असला तरी लुजर वाटत नाही. त्याच्यावर आम्हाला दया येत नाही. तो आत्मविश्वासू वाटतो. आणि आम्हाला आमचेच आश्चर्य वाटते.
जोकर चित्रपट एक चांगला चित्रपट आहे. मुख्य अभिनेता होकिंम ह्याने अद्वितीय अभिनय करून ह्या पात्राला उभे केले आहे. असंख्य क्रिकेटिव्ह लिबर्टी चित्रपटाने घेतल्या असल्या तरी एका अतिसामान्य माणसाच्या अतिसामान्य जीवनाचे चित्रण आणि त्या सर्वांतून डोके शॉर्ट होऊन बनणारा जोकर हे चित्रण मुद्दाम पाहावे असे आहे.