एका हाताने साहेबांच्या कॅबीनचा दरवाजा अर्धवट उघडत घाटगेंनी आपलं डोकं तेवढं त्या फटीतून आत घातलं. साहेब कामात होते. त्यांचं लक्ष दारातून डोकावणाऱ्या घाटगेंकडे गेले. त्यांनी हातातील पेन खाली ठेवत मानेनेच खुणावत घाटगेंना आत बोलावलं. ह्या साहेबांचं एक बरं होतं. औपचारीक परवानगीचा सोपस्कार न करता कोणीही त्यांच्या कॅबीनमध्ये येऊ शकत होतं. घाटगे तर त्यांचे खास होते.
” बोला घाटगे, काय विशेष?”
” काही खास नाही साहेब. आपला शिपाई , रमाकांत…”
” अरे हो, बरी आठवण झाली. आता कशी आहे त्याच्या बायकोची तब्येत? कधी येणार हा रमाकांत ऑफिसला?”
” बरी आहे ती आता. आज सोडतील तिला बहुतेक हॉस्पिटलमधून. उद्या यायला हवा तो ऑफीसला.” क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,”साहेब, हा रमाकांत खूप गरीब आहे. एकट्याच्या पगारावर त्याचं पाच माणसांचं घर चालतं. त्यात बायको दहा दिवस हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलचं बिल पण झालं असेल बऱ्यापैकी.” घाटगे बोलता बोलता थोडा वेळ थांबले आणि आपल्या हातात धरलेला कागद त्यांनी साहेबांसमोर केला.
” साहेब, आपण रमाकांत साठी थोडीशी आर्थिक मदत जमा करत आहोत. तेवढाच त्याचा भार थोडासा हलका होईल.”
साहेबांनी तो कागद हातात घेतला आणि एक त्यावर नजर टाकली. ऑफिसमधील सगळ्या कर्मचाऱ्यांची यादी होती ती. एकूण सत्तावीस लोकं. सगळ्यात वर साहेबांचं नाव आणि मग पदानुसार अन्य कर्मचाऱ्यांची नावं.
” हे खूप चागलं केलं तुम्ही घाटगे. आपल्या माणसाला आपणच मदत करायला हवी.”
साहेबांनी टेबलावरील पेन उचललं. घाटगे उत्सुकतेने बघत होते. क्षणभर विचार करत साहेबांनी आपल्या नावासमोर आकडा लिहिला, २५१/-. घाटगे मनातल्या मनात थोडे नाराज झाले.
नेहमीच्या रिवाजानुसार आज सुद्धा त्यांनी साहेबांपासून सुरुवात केली होती. आपल्या अगोदरची रक्कम बघून त्याप्रमाणे बाकी मंडळीआपली रक्कम लिहितात हा आजवरचा घाटगेंचा अनुभव होता. आता ह्या २५१ च्या हिशोबाने ऑफिसमधील बाकी लोकांची रक्कम जमा होणार होती.
” थॅन्क्स साहेब. ” साहेबांनी पुढे केलेला केलेला कागद आपल्या हातात घेत घाटगे म्हणाले आणि केबिनच्या बाहेर पडले.
“अरे सुरेश, ही लिस्ट फिरव जरा सगळ्यांच्या टेबलावर.” बाहेर आल्या आल्या त्यांनी तो कागद सुरेशच्या हातात दिला.
“अरे, किती लिहू या रे? ”
” साहेबांनी किती लिहिले आहेत ते बघ आणि लिही त्याप्रमाणे.”
” च्यायला, काही ना काही सुरूच आहे सालं.”
” हो ना.”
” ए अवी, माझे पण दे रे. मी तुला देतो नंतर.”
सुरेशची लिस्ट जसजशी फिरत होती तसतश्या एकेकांच्या कॉमेंट्स येत होत्या.
अवघ्या अर्ध्या तासात सुरेशने तो कागद पुन्हा आणून घाटगेंच्या हातात दिला.
“साहेब. झालं सगळ्यांचं, फक्त संदीप सर सोडून. ते आले नाहीत आज कामावर.”
घाटगेंनी संदीपच्या टेबलाकडे नजर टाकली. खुर्ची रिकामी होती. का बरं आला नाही आज?
” अहो घाटगे, लिहून टाका एकावन्न त्याच्या नावावर.” कोपऱ्यातल्या टेबलावरून राणेंचा आवाज आणि सोबत थोडंसं कुत्सित हसणं.
” अरे एकावन्न काय? शॉक बसेल त्याला. अकरा रुपये लिहा घाटगे, अकरा.” डीसोझाच्या बोलण्यावर सगळा स्टाफ खो खो हसत सुटला.
” कसला चिकट माणूस आहे तो? एक पैसा सुटत नाही हातातून. चींगुस आहे नुसता.” संदीपची अपुरी राहिलेली ओळख अविनाशने पुरी केली.
संदीप हा कधी कधी असाच चेष्टेचा विषय बनायचा ऑफीसमध्ये. तसा तो कामात खूप हुशार आणि तितकाच प्रामाणिक. पण त्याचा स्वभाव विचित्र वाटे सगळ्यांना. पैसे खर्च करण्याच्या बाबतीत तर खूपच काटेकोर. कधी पार्टीमध्ये सहभाग नाही, एवढ्या वर्षात चुकून कधी तरी एखादी पिकनिक केली असेल ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत. गेल्या वर्षी तर ऑफिसमधील एका सहकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात ह्याने चक्क अकरा रुपयांचं पाकीट दिलं होतं. त्याचमुळे आज सुद्धा त्याच्या नावाने सगळं ऑफिस चेष्टा करत होतं, हसत होतं.
” घाटगेसाहेब, त्या कवडीचुंबकाचं राहू दे, तो काही देणार नाही. आपली रक्कम किती झाली आहे बघा ना.” हा श्रीकांत.
घाटगे भानावर आले. त्यांनी हातातील कागदावर नजर टाकली. साहेबांच्या २५१ पासून सुरू झालेली रक्कम घसरत घसरत ५१ पर्यंत आली होती . त्यांनी तशीच टोटल मारली. ३२५० रुपये जमले होते एकूण.
” तीन हजार दोनशे पन्नास रूपये जमा झाले आहेत एकूण.”
” गुड. आपण रमाकांतला फोन करू या. आज डिस्चार्ज आहे ना? त्याला जरा आधार वाटेल.?”
सगळ्यांनीच दुजोरा दिला श्रीकांतला.
घाटगेंनी मोबाईल घेतला आणि रमाकांतचा नंबर दाबला.
दोन तीन रिंग वाजल्यानंतर रमाकांतने फोन घेतला.
” घाटगे, फोन स्पिकरवर ठेवा.” श्रीकांत.
” हॅलो, नमस्कार साहेब.” सगळे आता घाटगे साहेबांच्या टेबलाजवळ जमा झाले होते , रमाकांतचा आवाज ऐकत होते.
“हॅलो रमाकांत, बायकोची तब्येत कशी आहे आता? तू पैशाची वगैरे काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत.”
” साहेब, खूप बरं वाटतंय आता तिला. आताच डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी. आम्ही आता रिक्षातच आहोत, घरी निघालोय.”
सगळ्यांचे कान आता रमाकांतच्या बोलण्याकडे लागले होते.
” डिस्चार्ज घेतला पण तुम्ही ? बिलाचं काय केलंस तू? बिल पण खूप झालं असेल ना? ”
” हो सर, बिल झालं होतं खूप. पण संदीप साहेबांनीच बघितलं सगळं ते.”
” संदीपसाहेब?”
आता सगळेच एकमेकाकडे आश्चर्याने बघत होते.
” हो साहेब, आपले संदीपसाहेब. सकाळपासून ते इकडेच होते हॉस्पिटलमध्ये. त्यांनीच सगळं बघितलं डिस्चार्जच्या बाबतीत, बिल वगैरे भरण्यापासून. आम्हाला रिक्षामध्ये बसवलं आणि नंतरच ते निघाले इथून.”
घाटगेंना पुढचं बोलणं सुचत नव्हतं. त्यांची नजर त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या त्या लिस्टकडे लागली होती. तो ३२५० चा आकडा त्यांना आता अधिकच ठळक दिसत होता…
एकाच वेळी त्यांची आणि त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांचीच नजर आपसूक संदीपच्या रिकाम्या खुर्चीकडे वळली होती….एका संवेदनशील, दिलदार कवडीचुंबकाची खुर्ची….
ॲलेक्स मच्याडो.